फडणवीस स्पष्ट बोलले : राज- उद्धव एकत्र येण्यावर मोठे भाष्य
-पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणाची चर्चा
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा सुरु झालीय. २००५ मध्येच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले होते. त्यानंतर आता ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचे म्हटलं जात हे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये बोलताना, दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राचे भाषिक आणि सांस्कृतिक हित सगळ्यापेक्षा वर असल्याचे म्हटलं. या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघेजण एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे असे म्हटले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच वर्षांपासून सुरु आहे. मात्र आता दोन्ही नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे पुन्हा या चर्चेला वेग आला आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी युतीबाबत प्रस्ताव दिला असता उद्धव ठाकरे यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी यावर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
दोघेजण एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरुन एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये वाईट वाटण्याचे काही कारण नाही. माध्यमे त्याच्यावर जरा जास्त विचार करतात. पण वाट बघा. एकत्र आले तर उत्तम आहे आम्ही त्यांचे स्वागत करु. ऑफर देणारे हे, त्यानंतर त्यावर प्रतिसाद देणारे आणि अटी ठेवणारेही तेच. त्यावर मी काय बोलणार? त्यामुळे याबाबत मला जास्त विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारलं पाहिजे,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रश्नावर बोलताना चिडल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी चिडून पत्रकाराला जाऊ दे यार, काय करता कामाचं बोला असं म्हटलं.