मोदींच्या गुजरातमधून काँग्रेसने दिला हा संदेश, म्हणाले…घराबाहेर!

मोदींच्या गुजरातमधून काँग्रेसने दिला हा संदेश, म्हणाले…घराबाहेर!

-भाजपाला रोखण्यावर विचारमंथन

प्रतिनिधी
गुजरात : तुम्ही घराबाहेर पडा, सत्तेतील बदल तुमची प्रतीक्षा करतोय,” असा संदेश काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. गुजरातच्या अहमदाबाद शहरात तब्बल सहा दशकांनंतर पहिल्यांदाच साबरमती नदीच्या किनारी काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात प्रथमच गुजरातसंदर्भातील एक विशेष ठराव संमत करण्यात आला, ज्याद्वारे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या पुढील वाटचालीचा आराखडा तयार करण्यात आला. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही विजयाची घोडदौड कायम ठेवणाऱ्या भाजपाला यापुढं कसं रोखायचं, यावरही अधिवेशनात विचारमंथन करण्यात आलं.

काँग्रेसला तीन दशकांपासून गुजरातमध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. मात्र, असं असूनही राज्यात पक्षाचं संघटन अजूनही सक्रिय असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसनं आतापासूनच मिशन २०२७ अंतर्गत गुजरात काबीज करण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या अधिवेशनामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला असला तरी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांचं मनोबल टिकून राहील का? अशी चिंता काँग्रेसचे ज्येष्ठ व युवा नेते व्यक्त करीत आहेत.

काँग्रेस नेतृत्वाने शनिवारी प्रत्येक जिल्हा काँग्रेस समितीसाठी एका अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या निरीक्षकासह चार प्रदेश काँग्रेस समिती निरीक्षकांची नियुक्ती केली. डीसीसी अध्यक्षांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेवर देखरेख करण्यासाठी हे निरीक्षक अरवली जिल्ह्यातील मोडासामध्ये सोमवारी (१४ एप्रिल) बैठक घेतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मंगळवार व बुधवार या दोन दिवसांत काँग्रेसच्या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनात घेण्यात आलेल्या निर्णयांनुसार, जिल्हा स्तरावरील संघटना मजबूत करणं हेच पक्षाचं पुढील लक्ष्य आहे.

काँग्रेसला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला
अधिवेशनात प्रभावी विरोधी पक्ष होण्याचं आवाहन करणारे गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जिग्नेश मेवाणी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले, “अखिल भारतीय काँग्रेस आणि राहुल गांधी हे निश्चितच गुजरातला खूप गांभीर्यानं घेत आहेत. या बैठकीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळाली आहे. “पक्षाच्या सर्व संघटना उत्साहित आहेत. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं पक्षाला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. “जिल्हा काँग्रेस समितीचं नेतृत्व करण्यासाठी कोणाची नियुक्ती केली जाते हे सर्वांत महत्त्वाचं आहे. तसेच पक्षातील तरुण कार्यकर्त्यांना तळागाळातील लोकांपर्यंत संपर्क वाढवावा लागेल. तेव्हाच मतदार काँग्रेसला गांभीर्यानं घेतील”, असं त्यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसच्या एका तरुण नेत्याचं म्हणणं आहे की, पक्षाला गुजरातसंदर्भातील ठराव थोडा अधिक प्रभावी पद्धतीनं मांडता आला असता. २०२७ मध्ये गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार असेल, असं राहुल गांधी यांनी संसदेत बोलून दाखवलं आहे. पक्षाबरोबर विश्वासघात करणाऱ्या नेत्यांची तातडीनं हकालपट्टी करा, असं आव्हानही त्यांनी केलं आहे. पण, या गोष्टी त्यांनी अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवल्या असत्या, तर चांगलं झालं असतं. काही नेत्यांनी तर त्यांच्या भाषणातून जो आराखडा मांडला, तो पक्षाच्या सर्वोच्च नेत्याकडून आला असता, तर अधिकच प्रभाव पडला असता, असंही ते म्हणाले.

महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गावर चालण्याचं आश्वासन देणाऱ्या या ठरावात काँग्रेसनं अनेक आश्वासनं दिली आहेत. त्यामध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास गुजरातमध्ये जातीय जनगणना केली जाईल या महत्त्वाच्या आश्वासनाचा समावेश आहे. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय यांना घटनात्मक हक्क दिले जातील, असे आश्वासनही काँग्रेसने आपल्या ठरावातून दिले आहे.

दरम्यान, हा ठराव मांडणारे काँग्रेसचे माजी राज्य विरोधी पक्षनेते परेश धनानी म्हणाले, “पक्षाचा ठराव तीन मुद्द्यांवर केंद्रित आहे. पहिला मुद्दा हा काँग्रेस परत येईल आणि राज्यात समृद्धी आणेल. दुसरा मुद्दा पक्षाने ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्याच्या लढाईचं नेतृत्व केले आणि पुन्हा स्वातंत्र्यासाठी (भाजपाविरुद्ध) आणखी एका लढाईचं नेतृत्व करण्याचा आहे. तर, तिसरा मुद्दा गुजरातमधून सुरू झालेला हा लढा पुन्हा गांधी आणि सरदार पटेलांच्या भूमीतून सुरू होणार आहे. काँग्रेस पक्षासमोरील आताची आव्हानं वेगळी आहेत. त्यामुळे संघर्षशील राहून आपल्याला कठोर मेहनत घ्यावी लागेल. पक्षाला पुन्हा सत्तेत परत आणण्यासाठी आपल्यात ‘जिद्द’ असली पाहिजे”.

 

spot_img