या राज्यातील काँग्रेस सरकार आले अडचणीत : या नेत्याचा गंभीर आरोप

या राज्यातील काँग्रेस सरकार आले अडचणीत : या नेत्याचा गंभीर आरोप

-भ्रष्टाचाराचा मुद्दा तापला

प्रतिनिधी
कर्नाटक : महागाई व भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला हाताशी धरून काँग्रेसने २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकली. स्वबळावर बहुमाताचा आकडा गाठल्यानंतर पक्षाने राज्यात दिमाखात सत्तास्थापना केली. मात्र, काँग्रेसने ज्या मुद्द्यावर जनतेचं लक्ष वेधून भाजपाला सत्तेतून बाजूला सारलं होतं, तेच मुद्दे त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे, राज्यातील विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाचे आमदार बसवराज रायरेड्डी यांनी बुधवारी (तारीख ९ एप्रिल) केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे कर्नाटकातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

बसवराज यांच्या विधानामुळे काँग्रेस अडचणीत?
बसवराज रायरेड्डी हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आर्थिक सल्लागार आहेत. कर्नाटक भ्रष्टाचारात अजूनही पहिल्या क्रमांकावर असल्याचं विधान करून त्यांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मंगळवारी कोपल जिल्ह्यातील एका अधिकृत बैठकीत बसवराज यांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधात असलेल्या भाजपाला सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळालं आहे.

विशेष बाब म्हणजे, गेल्यावर्षीही बसवराज यांनी काँग्रेस सरकारला अडचणीत आणणारं विधान केलं होतं. काँग्रेसच्या हमी योजनांच्या बोजामुळं राज्य सरकारकडे विकासकामांसाठी पैसे नाहीत, असं ते म्हणाले होते. इतकंच नाही तर पक्षातील अनेक आमदार त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मागत असून सरकारकडे त्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, असंही बसवराज यांनी म्हटलं होतं.

spot_img