करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखेच

करुणा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध लग्नासारखेच

-माझगाव कोर्टाचे निरीक्षण

प्रतिनिधी
बीड : करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत, असे माझगाव सत्र न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका माझगाव सत्र न्यायालयाने फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या याच आदेशाची सविस्तर प्रत आता समोर आली आहे. याच सविस्तर प्रतीमध्ये करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत, असं माझगाव सत्र न्यायालयाने म्हटले आहे.

करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचा निकाल वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाने दिला होता. याच निर्णयाला धनंजय मुंडे यांनी याचिकेच्या माध्यमातून आव्हान दिलं होतं. हीच याचिका फेटाळून माझगाव सत्र न्यायालयाने 5 एप्रिल रोजी निकाल दिला होता. या निकालाची प्रत आता समोर आली आहे. या निकालात दोघांनी 2 मुलांना जन्म दिला. हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

आपल्या याचिकेत करुणा मुंडे यांच्याशी लग्न केलं नसल्याचा धनंजय मुंडे यांनी दावा केला होता. मात्र धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत, असं सत्र न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. तसेच एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा मुंडे यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे. करुणा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. यावेळी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे इच्छापत्र सादर केले होते. याच इच्छापत्रात करुणा मुंडे यांचा पहिली पत्नी असा उल्लेख आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या इच्छापत्रात चार मुलांची नावे होती. हे इच्छापत्र खरं असल्याचं करुणा मुंडे यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे करुणा मुंडे यांनी सादर केलेलं धनंजय मुंडे यांचं इच्छापत्र हे खोटं असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला होता. 2017 सालाच्या आसपास हे इच्छापत्र बनवण्यात आल्याची नोंद आहे. याच सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली होती.

spot_img