मिशन बिहारपूर्वीच भाजपात दुफळी : हे ठरले प्रमुख कारण

मिशन बिहारपूर्वीच भाजपात दुफळी : हे ठरले प्रमुख कारण

-या खासदाराने केली लोकसभेत टीका

प्रतिनिधी
देहाराडून :  गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला. मात्र, त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकून पक्षाने जोरदार पुनरागमन केलं. इतकंच नाही, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपानं आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला सत्तेतून बाजूला सारून भाजपानं तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत सत्ता स्थापन केली. आता पक्षाचे पुढील लक्ष्य बिहार निवडणूक आहे. मात्र, त्याआधीच भाजपामध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. अनेक राज्यांत पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद होत असल्याचं दिसून येत आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री व लोकसभा खासदार त्रिवेंद्र सिंह रावत यांनी संसदेत बोलताना आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे. उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदा खाणकाम होत असल्याचं सांगून त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील लोणीचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी अलीकडेच योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यावरून भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. कर्नाटकमध्येही भाजपाच्या नेत्यांमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, त्यांचे पुत्र व राज्य भाजपा प्रमुख बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर टीका केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी आमदार बसनगौडा पाटील यत्नल यांची हकालपट्टी केली आहे. भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले की, पक्षाच्या राज्य युनिट्समधील गटबाजी समोर येण्याचे एक कारण म्हणजे पक्षात होत असलेली इनकमिंग आहे.

दुसऱ्या पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. त्यामुळे पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. उत्तराखंडमध्ये भाजपा नेत्यांमध्ये मतभेद होण्याचं प्रकरण थोडं वेगळं आहे. “त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांसमोर संसदेतच राज्यातील पक्षनेतृत्वावर बोट ठेवलं आहे. उत्तराखंडमध्ये सर्रासपणे बेकायदा खाणकाम सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय. त्यामुळे हे प्रकरण खूपच गंभीर आहे”, अशी चिंता भाजपाच्या एका नेत्यानं व्यक्त केली आहे.

दरम्यान, उत्तराखंडमधील भाजपा नेत्यांमधील संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत. त्यामागचं कारण म्हणज रावत हे सातत्यानं राज्याच्या खाण विभागाचे सचिव ब्रजेश संत यांना लक्ष्य करीत आहेत. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सचिवांनी एक तथ्य पत्रक जाहीर केलं. त्यावर पत्रकारांनी रावत यांना विचारलं असता, “वाघ कुत्र्याची शिकार करीत नाही”, असं उत्तर त्यांनी दिलं. रावत हे उच्चवर्णीय ठाकूर आणि ब्रजेश संत हे दलित असल्यानं त्यांच्या वक्तव्याला जातीयवादी ठरवण्यात आलं. त्यानंतर उत्तराखंड आयएएस असोसिएशननं रावत यांच्या विधानाबाबत निषेध व्यक्त केला.

spot_img