हे काय? भाजपात घराणेशाही म्हटले अन नेत्याचे निलंबन झाले

हे काय? भाजपात घराणेशाही म्हटले अन नेत्याचे निलंबन झाले

-पक्षाला कौटुंबिक मालमत्ता बनविल्याचा आरोप

प्रतिनिधी
कर्नाटक : कर्नाटक भाजपामध्ये अंतर्गत राजकारणाने दुफळी माजली आहे. सत्तेबाहेर असलेल्या भाजपाला संघटनेतील वादाचा सामना करावा लागत आहे. कर्नाटकमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि त्यांचे सुपुत्र खासदार विजयेंद्र येडियुरप्पा यांच्याविरोधात घराणेशाहीची टीका केली. या टीकेनंतर बसनगौडा पाटील यत्नाळ यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन झाल्यानंतरही यत्नाळ आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.

बीएस येडियुरप्पा आणि त्यांच्या कुटुंबाने कर्नाटक भाजपाला स्वतःची कौटुंबिक मालमत्ता बनवले, असा आरोप यत्नाळ यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे राजकारण संपविण्याची भाषा वापरतात. मात्र कर्नाटकमध्ये त्यांच्या या संकल्पाला हरताळ फासला जात असल्याचा आरोप यत्नाळ यांनी केला.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना यत्नाळ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभांमधून घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तडजोडीच्या राजकारणाविरोधात बोलत असतात. जे मोदी बोलतात, त्याचीच री मी ओढली, तर मला पक्षातूनच निलंबित करण्यात आले. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करणार नाही.”

पक्षातून हकालपट्टी झाली असली तरी यत्नाळ यांनी भाजपाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहणार असल्याचे सांगितले. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी हे आदर्श नेते होते, त्यांच्या विचारांवर आपण काम करत राहणार, असेही यत्नाळ म्हणाले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्ष संघटनेतील वादांमध्ये लक्ष घातले नाही का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर यत्नाळ म्हणाले की, पंतप्रधान मोदींकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या पक्षसंघटनेत काय चालले आहे, याची त्यांना कल्पना असण्याची शक्यता कमीच आहे.

 

spot_img