भाजपाची नवी जबाबदारी कुणावर? : होणार मोठे फेरबदल
-मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक
प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपाकडून संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. ज्यामुळे मार्चच्या पहिल्या आठवड्यात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. होळीपूर्वी (१४ मार्च) भाजपाला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतात, असं इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाने जे. पी. नड्डा यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवली. त्याआधी अमित शाह हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. २०१४ मध्ये त्यांनी आक्रमक प्रचार केला आणि केंद्रात भाजपाला सत्ता मिळवून दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या मोठ्या विजयाचे श्रेय अमित शाह यांना दिलं जातं. त्यांच्या कार्यकाळात भाजपाने उत्तराखंड, महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, गुजरात, हिमाचल प्रदेश, मणिपूर, झारखंड, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये निवडणुका जिंकल्या, तसेच नागालँड आणि मेघालयात आघाडी मिळवली.
मात्र मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या प्रमुख हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय दिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठं अपयश आलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर तब्बल ३०३ जागा जिंकून पुन्हा एकदा सत्तेत येण्याची किमया करून दाखवली, तेव्हा अमित शाह यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जून २०१९ मध्ये भाजपाने पहिल्यांदा पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जे. पी. नड्डा यांची निवड केली. जानेवारी २०२० मध्ये त्यांची एकमताने भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.