ठरलंय ! १८ किंवा १९ फेब्रुवारीला दिल्लीचा मुख्यमंत्री

ठरलंय ! १८ किंवा १९ फेब्रुवारीला दिल्लीचा मुख्यमंत्री

-भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाल्यामुळे भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्लीच्या विधानसभेत आम आदमी पक्षाला फक्त २२ जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाला ४८ जागा मिळाल्या आहेत. तसेच काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. आता दिल्लीत लवकरच भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. मात्र, दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबत सध्या मोठी चर्चा सुरु आहे. दिल्लीचं मुख्यमंत्री कोण असणार? हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

खरं तर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे. या अनुषंगाने सोमवारी (१७ फेब्रुवारी) भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी ३ वाजता होणार असल्याचं वृत्त एएनआयच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे. या बैठकीत मुख्यमंत्री कोण असणार? हे ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री ठरल्यास नवीन सरकारचा शपथविधी सोहळा १८ किंवा १९ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती देखील सांगितली जात आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या नव्या सरकारमध्ये प्रमुख मंत्रिपदासाठी १५ आमदारांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह आदी महत्वाच्या नेत्यांच्या बैठकीत दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपाचे सर्व ४८ नवनिर्वाचित आमदार सोमवारी दिल्ली भाजपाच्या कार्यालयात दाखल होतील. त्यानंतर होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी नावावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर सरकार स्थापनेचा शपथविधीची तारीख ठरण्याची शक्यता आहे.

 

spot_img