या माजी रेल्वे मंत्र्याने व्यक्त केली चिंता, म्हणाले कुंभ….!
-चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू
प्रतिनिधी
नवी दिल्ली : येथील रेल्वे स्थानकावर काल (शनिवारी) रात्री चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. याचबरोबर या दुर्दैवी घटनेबाबत संतापही व्यक्त होत आहे. अशात माजी माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी, रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाल्याचे म्हटले आहे.
याबाबत बोलतना लालू प्रसाद यादव म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रेल्वेच्या या गैरव्यवस्थापनामुळे इतक्या लोकांचे जीव गेले. रेल्वेमंत्र्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.” यावेळी लालू प्रसाद यांना महाकुंभमेळ्यासाठी गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत विचारले असता ते म्हणाले, “कुंभला काही अर्थ नाही. कुंभ फालतू आहे.” याबाबद एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.
शनिवारी रात्री दहाच्या दरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर भाविकांची धावपळ सुरू झाली आणि चेंगराचेंगरीमागे हेच कारण असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर आता या घटनेमागील कारणे शोधण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
– राहुल गांधी यांची टीका
दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्यापूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाकुंभमेळ्याला प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे स्थनकांवर योग्य व्यवस्था केली नसल्याची टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून सहानुभूति व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. सरकार आणि प्रशासनाने गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये याची काळजी घ्यावी.”