ठोस आश्वासन : हा पक्ष मतदारांना देणार २५ लाखांचा आरोग्य विमा
-दिल्ली विधानसभा निवडणूक
प्रतिनिधी
नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आपसह सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस दिल्लीतील जनतेसाठी मोठमोठी आश्वासने देत आहे. ‘प्यारी दीदी योजने’नंतर काँग्रेसने आता दुसऱ्या मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.
काँग्रेसची दुसरी योजना म्हणजे ‘जीवन रक्षा योजना’. पक्ष सत्तेत आल्यास या योजनेअंतर्गत प्रत्येक दिल्लीकराला २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेसने बुधवारी (दि.८) आश्वासन दिले की, दिल्लीत पुन्हा सत्तेवर आल्यास २५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा देण्यासाठी ‘जीवन रक्षा योजना’ सुरू केली जाईल.
ही योजना गेम चेंजर ठरेल – अशोक गेहलोत
दिल्लीत काँग्रेसने ‘जीवन रक्षा योजना’ जाहीर केली. त्यावेळी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत म्हणाले की, पक्षाची ही प्रस्तावित योजना गेम चेंजर ठरेल. तसेच, दिल्लीत काँग्रेसचे सरकार बनण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. मला विश्वास आहे की हे देशासाठी देखील महत्त्वाचे आहे. प्रस्तावित योजना दिल्लीतील रहिवाशांच्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठी पक्षाची बांधिलकी दर्शवते.
दोन दिवसांपूर्वी ‘प्यारी दीदी योजने’ची घोषणा
काँग्रेसने गेल्या सोमवारी प्यारी दीदी योजनेची घोषणा केली. प्यारी दीदी योजनेअंतर्गत पक्षाने सत्तेत आल्यास दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात या योजनेची घोषणा केली. दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसची ही पहिलीच मोठी निवडणूक घोषणा होती.