माजी मुख्यमंत्री उदार झाले : २०२२ पूर्वीच्या सर्व देणग्या उबाठाला देणार
-सर्व रक्कम परत करणार
प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेंकडेच ठेवल्या होत्या. तसेच पक्षाच्या चल-अचल संपत्तीवरही दोन्ही गटात दावे सुरु होते. यापैकी शिवसेना ताब्यात घेण्यापूर्वी पक्षाच्या खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम उद्धव ठाकरेंना परत करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आहे. खरी शिवसेना कोणाची याचा जवळपास निर्णयही जनतेने दिला आहे. आता मुंबई महापालिका निवडणूक येत आहे. या निवडणुकीत मुंबईत कोणाच्या शिवसेनेचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शिंदेंनी उदार मन दाखविले आहे.
शिवसेना पक्ष ताब्यात आल्याने या पक्षाला मिळालेल्या देणग्या, पक्षाची कार्यालये आदी गोष्टी शिंदेंकडे गेल्या होत्या. यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यावरून वाद घालत होते. उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे पैसा नसल्याने निवडणूक लढविण्यासाठी आर्थिक अडचणी येत होत्या. या सगळ्यावर आता शिंदेंनी तोडगा काढला आहे. २०२२ पूर्वी शिवसेनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेवर शिंदे गट दावा सांगणार नाही असा निर्णय शिंदेंनी घेतल्याचे वृत्त आहे. आजतकने याची माहिती दिली आहे.
२०२२ पूर्वी शिवसेनेच्या खात्यावर जेवढी रक्कम होती ती उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दिली जाणार आहे. सूत्रांनुसार शिंदे गटाने याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली आहे. उद्धव ठाकरेंपासून शिवसेना काढून घेतल्यानंतर शिंदेंनी आपण ठाकरेंच्या मागणीनुसार पक्षाची काही रक्कम दिल्याचे काहीवेळा जाहीररित्या सांगितले होते. आता उर्वरित रक्कमही ठाकरेंना देण्याचा निर्णय घेतला आहे.