शिंदेसेनेने महायुतीतील घटक पक्षांना दिला इशारा : धनुष्यबाण कसा चालतो…?

शिंदेसेनेने महायुतीतील घटक पक्षांना दिला इशारा : धनुष्यबाण कसा चालतो…?

-पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून सामंत यांचा इशारा

प्रतिनिधी
मुंबई : आपल्याला महायुतीमधूनच निवडणुका लढवायच्या आहेत”, असं वक्तव्य राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते उदय सामंत यांनी केलं आहे. परंतु, “कोणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण (शिवसेनेचं निवडणूक चिन्ह) कसा चालतो ते देखील आम्ही दाखवून देऊ”, असा इशारा देखील सामंत यांनी महायुतीमधील त्यांच्या मित्रपक्षांना दिला आहे. चिपळूण येथील शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून सामंत यांनी स्थानिक नेत्यांना इशारा दिला आहे.

जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा केली जाणार आहे. त्यातही राज्यातील २४७ नगरपालिका व १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या बाजूला, सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे.

राज्यातील अनेक मोठे नेते आपापल्या मतदारसंघात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरातील स्थानिक निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करू लागले आहेत. महायुती एकत्र लढण्याचा विचार करत आहे. महायुतीच्या नेत्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, चिपळूणमध्ये स्थानिक भाजपा पदाधिकारी स्वबळावर निवडणुका लढण्याची तयार करत असल्याचं सांगितलं जात आहे. काही पदाधिकाऱ्यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. यावरून मंत्री उदय सामंत यांनी महायुतीतील मित्रपक्षांना इशारा दिला आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले, “तालुक्यात काहीजण स्वबळाची भाषा करू लागले आहेत काहीजण म्हणतात की आम्ही स्वबळावर निवडणुका लढू आणि जिंकून दाखवू, आम्ही जिंकलेलोच आहोत, आमच्याकडे अमुक संस्था आहेत, तमुक संस्था आहेत, त्यामुळे जवळपास आमचा विजय निश्चित आहे. आम्ही लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत, अमुक तमुक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचलो आहोत, अशी भाषा केली जात आहे. परंतु, माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपल्याला महायुतीतूनच निवडणुका लढवायच्या आहेत. परंतु, कुणाला खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवण्याची व्यवस्था देखील केली जाईल.