विनोद तावडे यांचा का थांबला होता? खासदारकीचा प्रवास! वाचा कमबॅक

विनोद तावडे यांचा का थांबला होता? खासदारकीचा प्रवास! वाचा कमबॅक

-२०१९ पासून होते संविधानिक राजकारणापासून बाहेर

प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभेतील रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी नुकतीच निवडणूक जाहीर झाली आहे. या ३७ जागांपैकी महाराष्ट्रातील तब्बल ७ जागा असून त्या जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आज भाजपाने राज्यसभा निवडणुकीसाठी ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपा नेते तथा सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुटे यांच्या नावांचा समावेश आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत भाजपा कोअर कमिटीची नुकतीच एक बैठक पार पडली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह आदी दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही वरिष्ठ नेत्यांच्या नावांची चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर आज भाजपाकडून राज्यसभेसाठी चार जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामध्ये विनोद तावडे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे संसदीय राजकारणापासून काहीसे दूर गेलेले विनोद तावडे यानिमित्ताने कमबॅक करत आहेत. मात्र, २०१९ साली विधानसभेचं तिकीट कापल्यानंतर जवळपास सात वर्ष संघटनेत काम आणि आता थेट राज्यसभेची उमेदवारी, या दरम्यानचा विनोद तावडेंचा राजकीय प्रवास नेमकं कसा होता? याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

-२०१९ ला काय घडलं होतं?
विनोद तावडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पाच वर्ष विविध खात्यांची मंत्रिपदे भूषविली होती. मात्र, तरी देखील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना भाजपाने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे विनोद तावडे हे राज्याच्या राजकारणातून काहीसे बाहेर फेकले गेल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीसपदी
२०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली होती. उमेदवारी नाकारली तरी त्यांनी संयम दाखवला होता. भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवली. दरम्यान, राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे यांच्याकडे हरयाणा राज्याचे प्रभारी तसेच प्रधानमंत्री कार्यालयातील मन की बात व विविध केंद्र सरकारच्या योजनांची जबाबदारीही दिली गेली होती.

बिहारच्या निवडणुकीत महत्वाची जबाबदारी
बिहार विधानसभेच्या निवडणुकीत विनोद तावडे यांच्यावर भाजपाने महत्वाची जबाबदारी दिली होती. काही महिन्यांपूर्वीच बिहार विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विनोद तावडे यांच्यावर बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने पार पाडली आणि बिहार विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा एनडीएचं सरकार सत्तेत आलं. त्यामुळे आता विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणं हे त्यांच्या संघटनात्मक कौशल्याचं किंवा पक्षनिष्ठेचं फळ मानलं जात आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयामध्ये तावडे यांचं महत्वाचं योगदान मानलं जातं.