राहुल गांधींनी आरोप केलेला महादेवपुरा मतदारसंघ आहे असा
-१ लाख २५० मतांची चोरी झाल्याने चर्चेत
प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल
गांधी यांनी बिहारच्या मतदारयादी प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. याबाबत सत्ताधारी पक्षावर आरोप करताना त्यांनी दावा केला की, त्यांच्या हाती अणुबॉम्बसारखे पुरावे लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारे त्यांनी म्हटले की, आयोगाने २०२४ लोकसभा निवडणुकीत बंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातील महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपासाठी मतांची चोरी केली.
दिल्लीत गुरुवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, “बंगळुरू सेंट्रलमधील सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस जिंकली, फक्त महादेवपुरा सोडून. काँग्रेसला ही लोकसभा निवडणूक १ लाख १४ हजार ४६ मतांनी गमवावी लागली होती. मग आम्ही या आकडेवारीचा अभ्यास करायला सुरुवात केली. १ लाख १४ हजार ४६ हा एवढा मोठा आकडा एका मतदारसंघातून कसा आला? ही फार मोठी तफावत आहे. त्यामुळे आम्ही महादेवपुरा मतदारसंघातील तपशील पडताळू लागलो. त्यानंतर आम्हाला असे कळले की १ लाख २५० मतांची चोरी झाली आहे.” एकूण ६.५ लाख मतांपैकी १ लाख २५ मतांची चोरी झाली असा आरोप राहुल गांधींनी केला. “या मतांची पाच वेगवेगळ्या प्रकारे चोरी झाली. डुप्लिकेट मतदार, बनावट पत्ते, एकाच पत्त्यावर मोठ्या संख्येने मतदार, बनावट फोटो आणि पहिल्यांदाच नावनोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म ६चा गैरवापर.
२००८ मध्ये महादेवपुरा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून या जागेवर सलग चार निवडणुकांमध्ये भाजपाने यश मिळवले आहे. बंगळुरू सेंट्रल लोकसभा जागाही भाजपाकडेच राहिली असून काँग्रेस कायम दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. मात्र, बंगळुरू सेंट्रल लोकसभेतील इतर सात मतदारसंघांच्या तुलनेत महादेवपुरामध्ये मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.