राष्ट्रवादीचे विलीनकरण थांबले : फायदा होणार भाजपाचा
-ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांचे अनुभव
प्रतिनिधी
मुंबई : अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर बरोबर तीन दिवसांनी पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घडामोडींकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक कशा नजरेने पाहत आहे, याचा अंदाज घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी यांनी सातारा जिल्ह्यातील एका गावाला भेट दिली. तिथे आलेल्या अनुभवाबद्दल आणि लोकांशी साधलेल्या संवादाबद्दल त्या त्यांनी सांगितले आहे. तसेच राज्यात घडणाऱ्या या घडामोडींचा भाजपाला फायदा होऊ शकतो का? याबद्दलही त्यांनी मत व्यक्त केले आहे.
८० टक्के मराठा लोकसंख्या असलेल्या आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ‘गोडवली’ गावात लोक या नव्या वास्तवाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होते. एका मराठा-कुणबी कुटुंबातील सुनेला असे वाटले की, सुनेत्रा पवार या अजितदादांच्या वारसदार म्हणून सर्वोत्तम निवड आहेत. त्यांना आपल्या पतीच्या कामाची कोणापेक्षाही जास्त माहिती आहे आणि त्या हे काम पुढे नेण्यास सक्षम आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. त्या पुढे म्हणाल्या, “तसेच, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या महिलांचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतील.”
मात्र, त्यांच्या सासूचे मत वेगळे होते. “एवढ्या घाईघाईने शपथविधी होणे योग्य नव्हते,” असे त्या म्हणाल्या. “किमान परंपरेनुसार १३ दिवस तरी थांबायला हवे होते,” असे मत त्यांनी मांडले. मात्र, त्यांचे पती स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांनी लगेच राजकीय बाजू मांडली. “राजकारणात फार काळ पोकळी सोडून चालत नाही. त्यांच्यासाठी १३ दिवस हा खूप मोठा काळ होता,” असे ते म्हणाले.
नीरजा चौधरी म्हणतात, “मराठा समाजात आता अचानक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अजित पवारांचे निधन आणि शरद पवार यांचे ८५ वर्षे वय यामुळे, १९६० मध्ये राज्याच्या स्थापनेपासून सत्तेत अग्रभागी असलेल्या या समाजाला नेतृत्वाविना असल्याची जाणीव होत आहे. लोक राष्ट्रवादीच्या ‘बिगर-मराठा चौकडी’बद्दल बोलत होते. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना हालचाल करण्याची संधी मिळण्यापूर्वीच सुनेत्रा पवार यांना खुर्चीवर बसवण्यासाठी वेगाने पावले उचलली.”
त्या म्हणतात, अशा परिस्थितीत, काहींना वाटते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जे स्वतः मराठा आहेत त्यांना याचा फायदा होऊ शकतो. काहींच्या मते मराठा समाज पुन्हा शरद पवारांकडे वळू शकतो. जर शरद पवारांनी पाठिंब्यासाठी साद घातली तर लोक त्यांना समर्थन देऊ शकतात. अनेकजण त्यांच्या पुढील हालचालीची प्रतीक्षा करत आहेत. जर काँग्रेसने योग्य खेळी केली, तर लोक त्यांच्याकडेही आशेने पाहू शकतात.
-कुटुंबाला मोठा धक्का
अजित पवारांचे निधन पवार कुटुंबासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या जाण्याने १९९९ मध्ये शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राज्याच्या लोकसंख्येत साधारण ३५ टक्के वाटा असलेल्या आणि पक्षाचा कणा असलेल्या मराठा समाजाला आता अचानक ‘पोरकं’ झाल्यासारखं वाटत आहे, असे नीरजा चौधरी म्हणतात. अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंबातील गुंतागुंतीचे वैयक्तिक आणि राजकीय संबंध त्यांना एकत्र घेऊन आले. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर झालेल्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. पण त्यानंतर लवकरच मतभेद समोर आले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
अजित पवारांना शरद पवारांनी घडवले होते. पण २०२३ मध्ये त्यांनी पक्ष फोडला, काकांना बाजूला सारले आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर पुढच्याच वर्षी पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांच्या गटाला मिळाले. अलीकडच्या महापालिका निवडणुकीत दोन्ही गट पुणे आणि पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ल्यात एकत्र आले होते, पण त्यांना भाजपाकडून पराभव स्वीकारावा लागला. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णयाबाबत आपल्याला विचारले गेले नाही किंवा कळवले ही गेले नाही, असे शरद पवारांनी जाहीरपणे सांगितले आहे.
शरद पवार किंवा त्यांची कन्या, बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत. पवार साहेबांनी भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी गेल्या शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्याऐवजी सुनेत्रा पवार आणि त्यांची दोन मुले मुंबईला रवाना झाली. सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी स्पष्ट केले की, आता एकत्रीकरणाची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.


