राज्यात याठिकाणी भाजपा- राष्ट्रवादीने शिवसेनेला दूर सारले

राज्यात याठिकाणी भाजपा- राष्ट्रवादीने शिवसेनेला दूर सारले

-एकमेकाच्या पक्षातील इच्छुकांना गळाला लावण्याचे प्रयत्न

प्रतिनिधी
मुंबई : जिथे युतीतील मित्रपक्ष तुल्यबळ आहेत तेथे मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी विविध महापालिका, नगरपालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. त्याच धर्तीवर बदलापूर शहरात महायुतीतील भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली युती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे युती जाहीर करत असताना शिवसेनेला मात्र बाजूला सारले आहे.

गेल्या काही महिन्यात बदलापूर शहरात स्थानिक भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकमेकाच्या पक्षातील इच्छुकांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपा आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांकडून केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेली ही घोषणा शिवसेनेसाठी मोठे आव्हान मानले जाते आहे.

संपूर्ण राज्यात येत्या काही दिवसात नगरपरिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांसारख्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुकांची प्रक्रिया विविध स्तरापर्यंत पोहोचली आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या अ वर्ग नगर पालिका म्हणून अंबरनाथ आणि बदलापूर या नगर पालिका महत्वाच्या आहे. या पालिकांमध्ये यापूर्वी शिवसेनेचे वर्चस्व होते. येथे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तितकेसे मजबूत स्थितीत नव्हते. मात्र भाजपाने ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष देऊन आपली संघटनात्मक बांधणी मजबूत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाणे जिल्ह्यात आशिष दामले यांच्या रूपाने परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मंत्रिपद देऊ केले आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष शिवसेनेला आव्हान देण्याच्या स्थितीत आहेत.