यावरून मंत्र्याचा राजीनामा : नेत्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य भोवले
-आपल्या सरकारच्या कार्यकाळात मतदार यादीत घोळ
प्रतिनिधी
बंगळूरू : बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील कथित अनियमितता काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या, असे विधान करणारे कर्नाटकचे सहकारमंत्री के. एन. राजन्ना यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
माझ्याविरोधात कटकारस्थान करून मला जाणीवपूर्वक मंत्रिपदावरून हटविण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. यासंदर्भात आपण दिल्लीतील पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करून त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू, असंही ते यावेळी म्हणाले. एकीकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये कथितरित्या मतांची चोरी झाल्याचा आरोप इंडिया आघाडीचे नेते करीत असताना काँग्रेसच्या मंत्र्यानेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात मतदार यादीत अनियमितता झाल्याचा आरोप केल्याने विरोधकांची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
-के. एन. राजन्ना म्हणाले…
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेवपुरा मतदारसंघातील तब्बल एक लाखांहून अधिक मते चोरली गेली आणि त्यामुळेच भाजपाला बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर “मतदार यादी तयार होत असताना काँग्रेस नेते आक्षेप नोंदवण्याऐवजी डोळे झाकून शांत बसले. या अनियमितता होत असताना पक्षानं त्यावर लक्ष दिलं नाही, असं विधान राजन्ना यांनी ९ ऑगस्टला केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं राज्य काँग्रेसमधील काही नेते नाराज झाले आणि त्यांनी पक्षाच्या उच्च नेतृत्वाकडे राजन्ना यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळपर्यंत राजन्ना यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर राजभवनाला त्यांच्या राजीनाम्याची माहिती देणारे पत्र पाठवण्यात आले.