या जिल्ह्यात काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादीच्या गोटात

या जिल्ह्यात काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादीच्या गोटात

-पक्षात ताळमेळ राहिला नसल्याची खंत

प्रतिनिधी
अलिबाग: रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा आणखी एक नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गळाला लागला आहे. मुष्ताक अंतुले यांच्या पाठोपाठ आता अलिबागमधील नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कंपुत दाखल होणार आहे. जिल्हा कमिटी आणि प्रदेश सरचीटणीस पदावर कार्यरत राहिलेल्या या नेत्यांने पक्षात ताळमेळ राहिला नसल्याचे म्हणत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली पक्षाची वाताहत थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. एकामागून एक मातब्बर नेते पक्ष सोडून जात आहे. प्रदेश पातळीवरून पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी कुठलीही पाऊले उचलली जातांना दिसून येत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पक्षाला एकसंघ ठेऊ शकेल असा एकही नेता राहिलेला नाही. आघाडीच्या राजकारणात जिल्ह्यातील पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष करण्याचे पक्षश्रेष्टींचे धोरण संघटनेच्या मुळावर आले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

आधी रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे पनवेल तालुक्यातील पक्षसंघटना अडचणीत आली. नंतर माजी मंत्री रवींद्र पाटील भाजपात दाखल झाले. त्यामुळे पेण विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत महाड विधानसभा मतदारसंघात पक्षाने अस्तित्व टिकून ठेवले होते. मात्र माणिक जगताप यांच्या निधनानंतर मतदारसंघातील पक्षाची धुरा संभाळणाऱ्या स्नेहल जगताप पक्षाला सोडून गेल्या त्यामुळे महाडच्या पक्षसंघटनेला घरघर लागली. श्रीवर्धन मतदारसंघातून बॅरिस्टर अंतुले यांचे जावई मुष्ताक अंतुलेही पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झाले, त्यामुळे श्रीवर्धनमधील पक्षसंघटना रसातळाला गेली.