या जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण तापले : दोन बडे नेते ठाकले एकमेकांसमोर

या जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण तापले : दोन बडे नेते ठाकले एकमेकांसमोर

-आज गटनेता निवडण्याच्या हालचालीना वेग

प्रतिनिधी
चंद्रपूर : काँग्रेस गट नेता निवड करणे तथा गट नोंदणी करणेसाठी विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी खासदार धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर बैठकीबाबत नोटीस चिपकवली आहे. तेव्हा या बैठकीला न चुकता हजर रहावे. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी नोटीस घरावर चिपकवण्याचा अधिकारी राजेश अडूर यांना कोणी दिला, असा प्रश्न करीत खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवक पोलिस तक्रार करणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस पक्षात गट नोंदणी व गटनेता निवडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या सोमवार २ फेब्रुवारी रोजी काँग्रेस गटनोंदणी करणार आहे.

मात्र काँग्रेस पक्षाचे नगरसेवक वडेट्टीवार व धानोरकर अशा दोन गटात विभागले आहेत. वडेट्टीवार यांच्याकडे २० तर धानोरकर यांच्याकडे ७ नगरसेवक आहेत. अशातच वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी रविवार १ फेब्रुवारी रोजी त्यांच्या निवासस्थानी दुपारी बारा वाजता काँग्रेस पक्षाच्या सर्व २७ नगरसेवकांची बैठक बोलावली होती.

या बैठकीची नोटीस धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या हाती देण्याऐवजी त्यांच्या घरावर नोटीस चिपकविण्यात आली. नोटीस घरावर चिपकवण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये सुरेंद्र अडबाले, सुनंदा धोबे , रामनरेश यादव, राहुल घोटेकर व शेख या नगरसेवकांचा समावेश आहे. या नोटीस मध्ये गट/आघाडी नोंदणी करण्याचा निर्णय घेणे, गट/आघाडी नोंदणी करण्याचा निर्णय झाल्यास, गटनेत्याची निवड करणे, गट/आघाडी नोंदणी करण्याचा निर्णय झाल्यास गटाची घटना/नियम तयार करून त्यास मान्यता देणे, गट/आघाडी नोंदणी करण्याचा निर्णय झाल्यास, नोंदणी करण्याचे अधिकार प्रदान करणे या चार मुद्यांचा समावेश होता. दरम्यान गट नेता निवडीआधीच राजेश अडूर यांनी कोणत्या अधिकारात काँग्रेस नगरसेवकांना ही नोटीस बजावली तसेच घरावर लावली असा प्रश्न आता धानोरकर गटाचे नगरसेवक करीत आहे.

दरम्यान सुरेंद्र अडबाले यांच्या ज्या घरावर नोटीस लावण्यात आली तिथे त्याचा भाऊ वास्तव्याला आहे. पक्षाच्या बैठकीच्या नोटीस अशा प्रकारे पाठविता येत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकरणी आता धानोरकर गटाचे नगरसेवक पोलिस तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी नगरसेवक राजेश अडूर यांना विचारणा केली असता नोटीस सर्व २७ नगरसेवकांना पाठवली आहे. ज्यांनी नोटीस स्वीकारले नाही त्यांच्या घरावर नोटीस लावण्यात आली असेही सांगितले. दरम्यान वडेट्टीवार गटाकडे २० नगरसेवक असून उद्या गटनोंदणी करणार असल्याचे सांगितले. गटनेता ठरला नाही तर पत्र कसे काढले असा सूर उमटला आहे.