यवतमाळात या राजकीय घराण्यात वादाची ठिणगी
-चर्चा राजकीय गोटात
प्रतिनिधी
यवतमाळ : राज्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान राहिलेल्या पुसद येथील नाईक घराण्यात अखेर राजकीय फूट पडली. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे बंधू, माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव ययाती नाईक यांनी वडील आणि कुटुंबीयांच्या तीव्र विरोधानंतरही भाजपमध्ये प्रवेश घेतला. विशेष म्हणजे, त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल प्रदेश कार्यकारिणीकडून अद्याप कुठल्याही सूचना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या नसल्याने या प्रवेशाबाबत अनेक चर्चा राजकीय गोटात सुरू आहेत.
राज्याच्या राजकारणात स्वातंत्र्यपूर्व काळपासून नाईक घराण्याचे राजकीय वर्चस्व आहे. वसंतराव आणि सुधाकरराव नाईक असे दोन मुख्यमंत्री या घराण्याने महाराष्ट्राला दिले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर सुधाकरराव नाईक व मनोहरराव नाईक त्यांच्यासोबत गेले. आता मनोहरराव नाईक व त्यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. इंद्रनील नाईक हे लहान असुनही वडिलांनी राजकीय वारसा त्यांच्याकडे सोपविल्याने ययाती नाईक गेल्या अनेक वर्षांपासून नाराज असल्याची चर्चा पुसदमध्ये आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ययाती नाईक यांनी घरातच बंडाचे निशाण फडकवून इंद्रनील यांना आव्हान दिले होते. अखेर त्यांची समजूत घालून त्यांना वाशिम जिल्ह्यात निवडणूक लढण्यासाठी राजी केले. मात्र ययाती नाईक आजतागायत नाराज असल्याची चर्चा आहे.
गेल्या वर्षभरापासून ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरू होती. त्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक नेत्यांकडे विचारणा केली. मात्र काही महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थामुळे सक्रिय राजकारणापासून दूर असलेल्या मनोहराराव नाईक यांनी भाजपच्या नेत्यांना घरात राजकीय फूट पाडू नका, अशी विनंती केली होती, अशी विश्वसनीय माहिती आहे. त्यांच्या मतांचा आदर करून प्रदेश भाजपने ययाती यांना भाजपात प्रवेश देण्याचा मुद्दा दुर्लक्षित केला होता. प्रदेश भाजप पक्ष प्रवेश देणार नसल्याचे लक्षात आल्याने ययाती यांनी थेट दिल्ली गाठून तेथील वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने भाजपात प्रवेश केला. याची माहिती ते प्रवेश करेपर्यंत प्रदेश भाजपला नसल्याचे सांगण्यात येते. ययाती नाईक यांना अचानक पक्षात प्रवेश दिल्याने स्थानिक पातळीवर ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र आहे.