मोठा विजय : महायुतीची पताका ‘; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना होमपीचवर ‘धक्का’!
-कामठीत भाजपा- काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत
गजानन ढाकुलकर
नागपूर : जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात दिग्गजांना धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसला स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत मात्र मोठा फटका बसला असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या महायुतीने काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावला आहे.
सर्वात मोठा धक्का नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे यांना बसला आहे. त्यांच्या स्वतःच्या कांद्री नगरपंचायतीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. येथे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उमेदवार सुजित पानतावने यांनी एकतर्फी विजय मिळवत नगराध्यक्षपद काबीज केले. धक्कादायक म्हणजे, ज्या प्रभागात खासदारांचे स्वतःचे घर आहे, तिथेही भाजपच्या महिला उमेदवाराने विजय मिळवून काँग्रेसच्या प्रतिष्ठेला सुरुंग लावला. येथे भाजपचे १४ तर काँग्रेसचे केवळ ३ नगरसेवक निवडून आले आहेत.
जिल्हाध्यक्षांच्या ‘वाडी’तही कमळ फुलले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनाही आपल्या मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. वाडी नगरपरिषदेत भाजपचे नरेश चरडे यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रेमनाथ झाडे यांचा सुमारे ४ हजार मतांच्या फरकाने पराभव केला. खासदारांनंतर आता जिल्हाध्यक्षांनाही आपले गाव राखता आले नसल्याने काँग्रेसच्या वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.
महत्त्वाचे निकाल एका दृष्टिक्षेपात:
* गोधनी रेल्वे: काँग्रेसच्या माजी जि.प. उपाध्यक्ष कुंदा राऊत यांना धक्का देत भाजपचा नगराध्यक्ष विजयी.
* कामठी: महायुतीचे अजय अग्रवाल आघाडीवर.
* काटोल: महाविकास आघाडीच्या (शेकाप) अर्चना देशमुख यांनी आघाडी घेत भाजपला टक्कर दिली. त्या विजयी झाल्या.
* सावनेरमध्ये भाजपाच्या संजना मंगळे आणि मोहपा येथे काँग्रेसच्या माधव चर्जन विजयी.
* रामटेक: शिवसेना शिंदे गटाचे बिकेंद्र महाजन यांनी विजयाकडे कूच केली आहे.
-आतापर्यंत विजयी नगराध्यक्ष उमेदवार
कांद्री टेकाडी : सुजित पानतावने : शिवसेना (शिंदे)
वाडी : नरेश चरडे : भाजप
काटोल : अर्चना देशमुख : शेकाप (मविआ)
रामटेक : बिकेंद्र महाजन : शिवसेना (शिंदे)
मोहपा : माधव चर्जन : काँग्रेस
-नागपूर ग्रामीणमधील या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, महायुतीने अत्यंत सूक्ष्म नियोजनाद्वारे काँग्रेसच्या बड्या नेत्यांना त्यांच्याच होम पिचवर घेरले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निकाल काँग्रेससाठी आत्मचिंतनाचा तर महायुतीसाठी उत्साहाचा ठरणार आहे.


