मुनगंटीवार थेट म्हणाले, स्फ़ोट प्रकरणातील भरपाईवरून दुजाभाव का?
-पुन्हा आपल्याच सरकार ‘सुधीरभाऊ’ बरसले
प्रतिनिधी
नागपूर : काटोल तालुक्यातील रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटातील जखमींना २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. चंद्रपूर येथील सिमेंट कारखान्यात अदिवासी कामगारांच्या अंगावर पडलेल्या रसायनात जखमींची साधी विचारपूस केली गेली नाही. त्यांना २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यास सरकारने व्यवस्थापनाला भाग पाडावे, नागपूरला आणि चंद्रपूरला वेगळा न्याय का असा सवाल भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. जखमींना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.
नागपूर येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कारखान्यात एक मार्च रोजी भीषण स्फोट होऊन २२ कामगारांचा मृत्यू झाला. कारखान्यात स्फोटके बनवली जात असताना सुरक्षेचे नियम पाळण्यात आले नव्हते. कामगारांच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना नव्हती. या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करुन जबाबदार व्यवस्थापन व अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लक्षवेधी भाजपचे अतुल भातखळकर यांनी मांडली. त्याला नाना पटोले, विजय वडेट्टीवार समीर कुमावार, संजय मेश्राम यांनी उपप्रश्न विचारले. हे एक हत्याकांड आहे.
कारखान्याचा मालक आणि या कारखान्याची तपासणी करणारे अधिकारी या हत्याकांडात दोषी आहेत. त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नाना पटोले यांनी केली. ही घटना गंभीर आहे. सदस्यांच्या भावना आणि आक्रोश तीव्र आहे. कारखान्याचे मालक आणि इतर २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखाना मालकाला योग्य ती शिक्षा मिळावी यासाठी योग्य ती कायदेशीर कलम लावण्यात आलेली आहेत अशी माहिती राज्यमंत्री ॲड. अशिष जयस्वाल यांनी दिली.


