मुख्यमंत्र्यांचे गोडवे : या महिला आमदारांची पक्षातून हकालपट्टी

मुख्यमंत्र्यांचे गोडवे : या महिला आमदारांची पक्षातून हकालपट्टी

-पक्षविरोधी कारवाया न थांबवल्याचा आरोप

प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करणाऱ्या महिला आमदार पूजा पाल यांची समाजवादी पार्टीने पक्षातून हकालपट्टी केली. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती एका पत्रकाद्वारे देण्यात आली.

पूजा यांना यापूर्वीही पक्षाने नोटीसी पाठवल्या होत्या; पण त्यांनी पक्षविरोधी कारवाया थांबवल्या नाहीत, असं समाजवादी पार्टीने या पत्रकात म्हटलं आहे. यापुढील पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्यांना निमंत्रित केले जाणार नाही, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची स्वाक्षरी आहे. दरम्यान, कोण आहेत पूजा पाल? त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक नेमकं कशामुळं केलं? याबाबत जाणून घेऊ…

या आहेत आमदार पूजा पाल
आमदार पूजा पाल या बहुजन समाजवादी पार्टीचे दिवंगत आमदार राजू पाल यांच्या पत्नी आहेत. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी चैल विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या तिकीटावर विजय मिळवला आहे. प्रयागराजच्या काठघर परिसरातील एका साध्या कुटुंबात पूजा पाल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील टायर पंक्चरचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी पूजा यांनी शिक्षणाबरोबर अनेक लहान-मोठी कामे केली. त्यांनी खासगी कार्यालयांमध्ये, रुग्णालयांत आणि घरांच्या साफसफाईचे काम केले. रुग्णालयात काम करत असतानाच त्यांची ओळख बहुजन समाज पक्षाचे नेते राजू पाल यांच्याशी झाली. हळूहळू दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि १६ जानेवारी २००५ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर अवघ्या नऊ दिवसांतच पूजा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. २५ जानेवारी २००५ रोजी दुपारच्या सुमारास अतीक अहमद यांच्या टोळक्याने राजू पाल यांच्यावर हल्ला केला. यावेळी झालेल्या गोळीबार राजू यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येकडे राजकीय सूड म्हणून पाहिले गेले. कारण- काही दिवसांपूर्वीच राजू पाल यांनी अलाहाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अतीक अहमद यांचा भाऊ अशरफ अहमद यांचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. त्या वेळी पूजा फक्त २५ वर्षांच्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे जीवन न्यायासाठीच्या लढाईत बदलले. अतीक अहमद टोळीच्या धमक्या आणि दबावाला न जुमानता त्यांनी पतीची राजकीय परंपरा पुढे नेण्याची शपथ घेतली