मुख्यमंत्री बोलले, पेट्रोल पंपावरील गर्दीवरून दिला थेट इशारा

मुख्यमंत्री बोलले, पेट्रोल पंपावरील गर्दीवरून दिला थेट इशारा

-पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा तुटवडा नसल्याचे भाष्य

प्रतिनिधी
नागपूर : राज्यातील अनेक शहरात इंधन संपणार असल्याच्या अफवा पसरल्यामुळे पेट्रोलपंपावर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. सध्या विविध शहरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेलसाठी होत असलेली गर्दी, तसेच काही पंप कोरडे पडल्याचे जे चित्र पाहायला मिळत आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जनतेलाही गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेक नेत्यांनी श्रीराम नवमीच्या निमित्ताने नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरात हार्दिक गेले. तसेच यावेळी श्रीरामांचे दर्शन घेतले. यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. भगवान श्रीरामांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे आव्हानही त्यांनी केले.

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी स्पष्ट केले की, देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये आणि घाबरून इंधन खरेदी करू नये, असे आवाहन कंपन्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,…!
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारत सरकारने वारंवार सांगितले आहे की, सिलिंडर आणि पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा सरकारकडे आहे. त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याचे काही कारण नाही. पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी चुकीची आहे. जनतेमध्ये चुकीच्या संदेश पसरवला जात आहे. पुरवठा आणि मागणी याचा ताळमेळ बिघडल्यामुळे काही ठिकाणी अडचण निर्माण झाली. कारण लोकांनी भीतीपोटी पेट्रोलचा मोठ्या प्रमाणावर साठा केलेला आहे. मात्र जनतेने साठा करण्याची काहीही गरज नाही. केंद्र सरकारकडे पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा असून आपल्यावर कुठलीही अडचण येणार नाही, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या परिस्थितीचा फायदा घेऊन कोणी पेट्रोलचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कठोर शिक्षा करण्याचे आदेश दिले.

खतांचा काळा बाजार केल्यास
युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन आता खतांचा काळा बाजार होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारकडे खतांचा मुबलक साठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. कोणीही खतांचा काळाबाजार करताना आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.