मुंबई महापौर आहे मूळ या पक्षाच्या, असा झाला त्यांचा भाजपा प्रवेश

मुंबई महापौर आहे मूळ या पक्षाच्या, असा झाला त्यांचा भाजपा प्रवेश

-काँग्रेसने साधली टीकेची संधी, भाजपात अंतर्गत धुसफूस

प्रतिनिधी
मुंबई : भारतीय जनता पक्ष पोकळ असून जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा आव आणणाऱ्या पक्षाकडे मुंबईचा महापौर करण्यासाठी स्वतःच्या पक्षात एकही लायक उमेदवार सापडू नये हे दुर्दैवी आहे. रितू तावडे यांना महापौरपदाची संधी देऊन भाजपाने एका काँग्रेस कार्यकर्त्याला संधी दिली आहे, अशी टिप्पणी कॉंग्रेसने केली आहे.

मुंबई महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजपने महापौर पदासाठी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करताच त्यांच्या नावावरून एक वेगळाच वाद रंगला आहे. रितू तावडे या मुळच्या कॉंग्रेसच्या पदाधिकारी होत्या. बाहेरून आलेल्या नगरसेविकेला महापौरपद दिल्यामुळे पक्षातील अन्य नगरसेविकांमध्ये डावलल्याची भावना निर्माण झाली आहे. पण त्याचबरोबर त्यांच्यावर कॉंग्रेसकडूनही टीका होऊ लागली आहे.

काँग्रेसमुक्त भारताची वल्गना करणारा भाजपा आता पूर्णपणे काँग्रेसयुक्त झाला आहे, अशी खोचक टीका मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी केला आहे.

भाजपाकडे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी नाहीत, त्यांच्याकडे काँग्रेस व इतर पक्षातून घेतलेले लोकच पक्ष चालवत आहेत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपात त्यांचे स्वतःचे नेते, पदाधिकारी दुर्बीण लावून शोधावे लागतात अशी केविलवाणी परिस्थिती झालेली आहे.

भाजपामध्ये जे काही मोजके पदाधिकारी व कार्यकर्ते निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करत आहेत, त्यांना सतरंज्या उचलण्याचे काम दिले जाते हा त्यांचा पक्षाने केलेला अपमान आहे. सलग १२ वर्ष केंद्रात व १० वर्षे राज्यात सत्तेत राहूनही भाजपाला कार्यकर्ते उभे करता येत नाहीत. भाजपाची अवस्था ‘बडा घर पोकळवासा’ अशी झालेली आहे, अशीही टीका सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

काँग्रेस पक्ष विचाराचे व विकासाचे राजकारण करते, जाती पातीचे व धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे भाजपासारखे राजकारण करत नाही. निवडणुकीच्या तोंडावर हिंदु मुस्लीम, बांग्लादेशी असे मुद्दे उपस्थित करून मुंबईचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न भाजपाने केला.

मुंबईकरांना विवाद नको, विकास हवा आहे. बेस्टसह महापालिकेच्या विविध विभागात खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे, भ्रष्टाचार बोकाळला आहे, प्रदुषण वाढले आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी ह्या समस्या आहेत, त्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक महापालिकेत आवाज उठवतील व मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देतील. मुंबई विकण्याचे भाजपा महायुतीचे मनसुबे उधळून लावतील, असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.

रितू तावडे या मूळच्या कॉंग्रेस पक्षातील नेत्या आहेत. कॉंग्रेसमध्ये असताना घाटकोपर विधानसभा महिला विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. २०१२ मध्ये त्यांना कॉंग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१२ मध्ये त्या भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. भाजपने त्यांना शिक्षण समितीचे अध्यक्षपद दिले होते. २०१७ मध्ये त्या निवडणूक हरल्या होत्या. तर आता २०२६ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या असून अनुभवी नगरसेविका म्हणून त्यांची भाजपच्या महापौर पदी निवड झाली आहे.