मायबाप मतदारांनी सर्वात तरुण नगराध्यक्ष बनविला या जिल्ह्यात

मायबाप मतदारांनी सर्वात तरुण नगराध्यक्ष बनविला या जिल्ह्यात

-वय २१ ही झाले नाही

प्रतिनिधी
बुलढाणा: वयाची एकविशी जेमतेम ओलांडली, राजकीय पदार्पणातच थेट सिंदखेडराजा पालिकेच्या अध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली आणि निवडणूक जिंकून राज्यातील सर्वात तरुण पालिका अध्यक्ष देखील ठरले!

राजमाता जीजाऊंचे माहेर असलेल्या मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील सौरभ विजय तायडे या युवकाने राजकीय इतिहास घडवितानाच राज्यव्यापी विक्रम घडवीला आहे. अर्थात तो आता नुसताच युवक राहिला नसून सिंदखेड राजा नगरीचा प्रथम नागरिक (पालिका अध्यक्ष) झाला आहे. अचूक आकड्यात सांगायचे तर पालिका अध्यक्ष सौरभ तायडे यांचे वय २१ वर्षे, १० महिने, २८ दिवस इतके आहे. केवळ कार्यकर्ता असण्याच्या वयात त्याने मानाचे नगराध्यक्ष पद पटकावले! त्याच्या विजयाने सिंदखेड राजा नगरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ चे सूर दुमदूमले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजितदादा गटाचे मनोज कायंदे यांच्याकडून पराभूत होणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते यांच्या राजकीय भवितव्य विषयी शंका व्यक्त करण्यात आल्या. मात्र त्यांनी सिंदखेड पालिकेत यश मिळवून ‘ टायगर अभी जिंदा है ‘ हे दाखवून दिले. यामुळे हा विजय सिंदखेड राजाचे पाचदा आमदार, मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळणाऱ्या डॉ राजेंद्र शिंगणे यांनाही बळ देणारे ठरले. पालिका निवडणुकीत शरद पवारांच्या
पक्षाला जिल्ह्यात जेमतेम १३ सदस्यांच्या जागा मिळाल्या. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व टिकविणारा हा विजय आहे. यामुळे केवळ सौरभ तायडे यांचा वैयक्तिक नव्हे तर पक्षाला संजीवनी देणारा हा विजय ठरला आहे.

सिंदखेड राजा मतदारसंघांचे माजी आमदार राजेंद्र शिंगणे यांनी पालिका निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व गाजवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, अवघ्या २१ व्या वर्षी सौरभ विजय तायडे यांनी नगराध्यक्षपदी विराजमान होत महाराष्ट्रातील सर्वात तरुण नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यांनी ४२८७ मते घेत हा विजय संपादन केला.

२ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी एकूण ६ तर नगरसेवक पदासाठी ७० अशा एकूण ७६ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते. अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) सौरभ विजय तायडे यांनी प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटाचे उमेदवार श्याम मेहेत्रे व शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार अतिश तायडे यांचा पराभव केला. सौरभ तायडे यांनी ४२८७ मते घेत १६९ मतांनी विजय मिळवला. केवळ सिंदखेड राजाच तर महाराष्ट्राच्या राजकारणात कमी वयात नगराध्यक्ष होण्याचा विक्रम नोंदवला आहे.

पालिकेत शरद पवार गटाला सर्वाधिक ८ जागा मिळाल्या असून नगरपरिषद मध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाला ६ जागेवर विजय मिळाला आहे तर शिवसेना शिंदे सेनेचे ५ जागावर विजय मिळवला आहे तर भाजप १ जागेवर विजयी झाले आहेत. सौरभ तायडे यांनी आपल्या विजयाचे श्रेय मतदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तथा माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, वडील विजय तायडे आणि सिंदखेड राजाच्या तमाम जनतेला दिले. आहे. या विजयामुळे शहरात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

नगर परिषद निवडणुकीच्या निकालात मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. नगराध्यक्ष भूषवलेल्या तीन दिग्गज नेत्यांना यावेळी सदस्य पदाच्या (नगरसेवक) निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक ३ ‘ब’ मधून भाजपच्या उमेदवार नंदा विष्णू मेहेत्रे यांचा पराभव झाला आहे. तसेच २ अ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) चे उमेदवार सिताराम चौधरी आणि ४ ब मधून राजू आप्पा बोंद्रे यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. तीनही माजी नगराध्यक्षांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.