माणिकराव कोकाटेंचे खाते जाणार या मंत्र्यांकडे… पण, निर्णय…!
-जातीय समतोलाचाही पक्षनेतृत्वाला करावा लागेल विचार
प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या जागी वर्णी लागण्यास राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार) इच्छुकांना अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत तब्बल अडीच महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम असल्याने इतक्यात मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही, असे राष्ट्रवादीमधील सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे विधानसभेत ४१ सदस्य आहेत. महायुती सरकारमध्ये पक्षाच्या वाट्यास ९ मंत्रीपदे, १ राज्यमंत्री पद आणि विधानसभा उपाध्यक्ष अशी पदे आली आहेत. ९ मंत्रीपदांमध्ये ३ उत्तर महाराष्ट्र, ४ पश्चिम महाराष्ट्र, प्रत्येकी एक कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याला मिळाले आहे. यातील यवतमाळच्या इंद्रनील नाईक या विदर्भाच्या नेत्यास पक्षाकडील एकमेव राज्यमंत्री पद आहे. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागल्याने वंजारी समाजाचे पक्षातील मंत्रीपद गेलेले आहे.
माणिकराव कोकाटे हे उत्तर महाराष्ट्रातील होते. त्यामुळे या विभागाला कोकाटे यांचे रिक्त झालेले मंत्रीपद मिळावे, अशी पक्षात मागणी जोर धरत आहे. मराठवाड्याचे बाबासाहेब पाटील एकमेव मंत्री आहेत. धनंजय मुंडे आणि संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे दोन माजी मंत्री मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. मुंडे यांनी तर मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादीच्या मंत्रीपदांमध्ये तीन मराठा, दोन इतर मागासवर्गीय, दोन भटके व विमुक्त आणि अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जमातीचे प्रत्येकी एक अशी मंत्रीपदे आहेत. कोकाटे हे मराठा नेते होते. त्यामुळे जातीय समतोलाचाही पक्षनेतृत्वाला नवा मंत्री नेमताना विचार करावा लागेल.
राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि आरक्षणाच्या घोळमुळे रखडलेल्या नगरपंचायती व नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. भाजप नेतृत्व इतक्यात मंत्रीमंडळ विस्ताराला होकार देणार नाही. तसेच राष्ट्रवादी नेतृत्वाला घाई नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडेपर्यंत राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही. परिणामी, माणिकराव कोकाटे यांच्याकडील दोन्ही खाती पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे.
२३ फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन भरत आहे. या अधिवेशनाच्या तोंडावर कोकोटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांला शपथ दिली जाईल, असे राष्ट्रवादीमधील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मंत्रीपदासाठी राष्ट्रवादीमधील इच्छुकांना अडीच महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.


