महाराष्ट्रातील हा मंत्रिपुत्र आला पोलिसांना शरण : ठरले हे कारण
-मुंबई उच्च न्यायालयाने केली होती कान उघाडणी
प्रतिनिधी
अलिबाग : मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांसह पोलिसांची कानउघडणी केल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि सहकारी महाड पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंत्र्यांची मुले गुन्हा करून मोकाट फिरतात, मंत्र्यांच्या संपर्कात राहतात, परंतु पोलिसांना सापडत नाहीत. राज्यात कायदा, सुव्यवस्था आहे का नाही? मुख्यमंत्री या प्रकरणी गप्प का? ते इतके हतबल आहेत की ते मंत्र्यांविरोधात बोलू शकत नाहीत? अशा प्रकारचे ताशेरे गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने ओढले होते. यानंतर विकास गोगावले सकाळी १०.३० च्या दरम्यान पोलीस ठाण्यात हजर झाले. महाड नगरपालिका निवडणुकीवेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये तुफान हाणामारी झाली होती. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात शिवसेनेकडून विकास गोगावले पुतण्या महेश यांच्यासह इतर सात ते आठ जणांचा समावेश होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार माणिक जगताप यांचे बंधु हनुमंत जगताप, मुलगा श्रेयस जगताप, सुशांत जबरे, धनंजय देशमुख यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्वजण फरार होते.
या प्रकरणात माणगाव सत्र न्यायालयाने या सर्वांचे अटकपूर्व जामीन फेटाळले होते. त्यांनतर अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी उच्च न्यायालयात प्रयत्न सुरू असतानाच उच्च न्यायालयाच्या एकल पीठाने सुनावणी दरम्यान गुरुवारी कानउघाडणी केली. यानंतर विकास गोगावले, महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, धनंजय मालुसरे, वैभव मालुसरे, सुरज मालुसरे आणि सिद्धेश शेठ महाड पोलिसांसमोर हजर झाले. गोगावले हजर होताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे फरार पाच जण सायंकाळी चार च्या सुरुमारास पोलीस ठाण्यात हजर झाले. यामध्ये हनुमंत जगताप, श्रीयांस जगताप, धनंजय देशमुख, निलेश महाडिक आणि जगदीश पवार यांचा समावेश आहे. त्यांनाही न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


