मनपा निवडणुकीत नाराजांचा वेगळा झेंडा :भाजपासह सर्वच पक्षाची वाढणार डोकेदुखी

मनपा निवडणुकीत नाराजांचा वेगळा झेंडा :भाजपासह सर्वच पक्षाची वाढणार डोकेदुखी

-निवडणुकीत रंगत वाढण्याची चिन्हे

प्रतिनिधी
अकोला : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अकोल्यात महापालिका निवडणूक लढण्यासाठी सर्वाधिक इच्छूक भाजप पक्षांतर्गत आहेत. त्यामुळे उमेदवारी वाटपावरून पक्ष नेतृत्वाचा चांगलाच कस लागेल. शिवाय, नाराजीनाट्य रोखण्याचे आव्हान राहील. त्यातच आता नाराज गटाकडून वेगळी चूल मांडत मतदारांना तिसऱ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेषत: भाजपमधील सर्व नाराज व उमेदवारी न मिळणाऱ्यांना एकत्रित आणून स्वतंत्र आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे निवडणुकीत रंगत वाढण्याची चिन्हे आहे.

अकोला महापालिकेच्या २० प्रभागातील ८० जागांसाठी निवडणूक होत आहे. स्थापनेच्या अडीच दशकांमध्ये भाजपची तब्बल साडेबारा वर्ष सत्ता राहिली. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ८० पैकी ४८ जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले होते. आता पुन्हा वर्चस्व राखण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी केली. भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली. इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील एक हजार २२४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये इतर पक्षातील इच्छुकांचा देखील समावेश आहे. तिकीट वाटपानंतर पक्षांतर्गत नाराजी होऊन बंडखोरीची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय इच्छूक इतर पर्यायांचा देखील विचार करू शकतात. त्यामुळे भाजपकडून सावध पवित्रा घेतला जात आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून भाजप पक्षांतर्गत नाराज गट आहे. आपल्याला दुर्लक्षित व डावलण्यात येत असल्याचा आरोप या गटाकडून सातत्याने केला जातो. या प्रकारावर प्रदेशस्तरावरून देखील तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तो निष्फळ ठरला. त्यातच विधानसभा निवडणुकीत पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी तथा माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी व डॉ. अशोक ओळंबे यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात बंडखोरी केली. त्याचा फटका विजय अग्रवाल यांना बसून तब्बल २९ वर्षांनंतर भाजप बालेकिल्ला ढासळला.

त्यानंतर संबंधितांकडून जुळवून घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याला पक्ष नेतृत्वाने फारसा प्रतिसाद दिला नाही. परिणामी, आता नाराज गटातील सर्वांनी एकत्रित येत तिसरी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. तिसऱ्या आघाडी संदर्भात संवाद सभा घेऊन चाचपणी केली जात आहे. त्यासाठी दोन ते तीन बैठका देखील झाल्या आहेत. यासाठी हरीश आलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, ॲड. गिरीश गोखले आदींनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. या आघाडीमुळे इच्छुकांना आणखी एक पर्याय उपलब्ध होऊन निवडणुकीतील चूरस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करतांना प्रभागनिहाय वेगवेगळे समीकरण आखण्याचे नियोजन आहे. त्यासाठी काही प्रभागांमध्ये प्रबळ उमेदवारांसाठी वंचित आघाडी, शिवसेना आदी पक्षांचे समर्थन घेण्याचे देखील प्रयत्न असल्याची माहिती आहे.