भाजपाच्या गोटात अस्वस्थतेचे ठरले हे कारण, या जागांना बसेल फटका
-आज होणार युतीची घोषणा
प्रतिनिधी
नागपूर : मुंबई महापालिकेतील एकसंध शिवसेनेची तीन दशकांची सत्ता संपुष्टात आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. एकेकाळी दुरावलेल्या ठाकरे बंधूंनी (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी एकत्रित येण्याची तयारी केली आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीसंदर्भातील घोषणा आज गुरुवारी होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. दोन्ही पक्षांतील जागावाटपाच्या चर्चाही सुरळीत पार पडल्या असून फक्त औपचारिक घोषणा होणे बाकी असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले आहे. यादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास कोणाला फटका? भाजपाच्या गोटात प्रचंड अस्वस्थता का पसरली?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा भाजपावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तरीदेखील भाजपाच्या अंतर्गत गोटात मात्र अस्वस्थता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीचा सामना करण्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीने रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने मराठी अस्मितेचा मुद्दा जोरकसपणे मांडला जात आहे. अलीकडील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाप्रणित महायुतीने २८८ पैकी २०७ जागांवर दणदणीत विजय मिळवला असला तरी मुंबई महापालिकेची निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी इतकी सोपी नसेल, असे भाजपातील नेत्यांनी मान्य केले आहे.
-भाजपाने बदलली रणनीती?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे- ठाकरे गटाला नगराध्यक्ष पदाच्या केवळ नऊच जागांवर यश मिळविता आले आहे. यादरम्यान मराठी मतांचे ध्रुवीकरण झाल्यास त्याचा थेट फटका भाजपाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महायुतीतील नेतेही सतर्क झाले असून मुंबईसाठी नवीन रणनीती आखली जात आहे. नव्या युतीची घोषणा झाल्यास त्याचा राज्याच्या राजकारणावर काही ना काही परिणाम होताच. ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळे मराठी आणि मुस्लीम मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याची कबुली भाजपातील एका नेत्याने दिली आहे.
मुंबईत मराठी भाषिक मतदारांची संख्या अंदाजे २६ टक्के आहे. त्यातील बहुतांश मतदारांचा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला पाठिंबा असल्याचे दिसून येते. याशिवाय ११ टक्के मुस्लीम मतदारही भाजपाविरोधी पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता आहे. त्यातच ११ टक्के दलित लोकसंख्येचा एक मोठा हिस्साही भाजपापासून दुरावलेला दिसून येत आहे. ही सर्व आकडेवारी एकत्रित आल्यास ठाकरे बंधूंच्या युती भाजपासाठी मोठी आव्हानात्मक ठरू शकते. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेची कामगिरी निराशाजनक राहिली होती. परंतु असे असले तरीही महानगरपालिकेतील त्यांचे एकत्रित बळ दुर्लक्षित करता येणार नाही, असे भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितले.
दी इंडियन एक्स्प्रेसच्या आकडेवारीनुसार- मुंबईतील २२७ प्रभागांपैकी ६७ प्रभागांमध्ये मनसेला मिळालेली मते ही विजयी उमेदवाराच्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त होती. या ६७ पैकी ३९ प्रभागांत महाविकास आघाडीचे (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस–शरद पवार गट आणि शिवसेना-उद्धव गट) उमेदवार आघाडीवर होते, तर २८ वॉर्डांमध्ये सत्ताधारी महायुतीला आघाडी मिळाली होती. यादरम्यान मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीमुळे ३९ प्रभागांमध्ये भाजपाला मोठा फटका बसू शकतो. त्या शिवाय ज्या प्रभागांत महायुती आघाडीवर होती, तेथील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. जर असे झाल्यास भाजपाचा महापालिका निवडणुकीतील पराभव अटळ असल्याची कबुली एका मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
–मनसेबहुल मतदारसंघ
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ताकद प्रामुख्याने वरळी, दादर, माहीम, घाटकोपर, विक्रोळी आणि दिंडोशी-मालाड या मराठी पट्ट्यात दिसून येते. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी या भागात महाविकास आघाडीच्या तुलनेत निम्मी मते मिळवली होती. मनसेने मुंबईतील एकूण २५ जागांवर उमेदवार दिले होते आणि चार टक्के मते मिळवून १२३ प्रभागांवर आपला प्रभाव टाकला होता. शिवाय दिंडोशी विधानसभा मतदारसंघात मनसेने सातपैकी सहा प्रभागांमध्ये विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते घेतली होती. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट मनसेबरोबर युती करण्यास प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.


