बच्चू कडूंनी दिला सरकारला हा इशारा, म्हणाले, …!

बच्चू कडूंनी दिला सरकारला हा इशारा, म्हणाले, …!

-हमीभावाची चळवळ दडपण्याचा आरोप

प्रतिनिधी
अमरावती : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासह शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात राज्यभरात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिस्थळी गहुली (पुसद) येथे येत्या २९ जुलैला राज्यभरातील शेतकरी नेते चिंतन करणार आणि आंदोलनाची पुढील दिशा अधिक तीव्र ठरणार. शब्दाने फसवणे थांबवा, शेतकऱ्यांना हक्क द्या, नाहीतर ‘ट्रेलर’नंतरचा ‘पिक्चर’ तापदायक असेल, सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करावा, सरकारने आम्हाला उग्र आंदोलन करण्यास भाग पाडू नये, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. ज्या जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची व शेतकऱ्यांच्या मालाच्या हमीभावाची चळवळ दाबण्याचा प्रयत्न केला, तिथे पुन्हा चक्काजाम करणार, असा देखील इशारा बच्चू कडू यांनी दिला. आता कुठलीही पूर्वसूचना न देता मंत्रालयात घुसू, सरकारला शेवटचा इशारा, हे फक्त ट्रेलर होते, पुढचे पिक्चर धगधगते असेल, असे बच्चू कडू म्हणाले.

परतवाडा-अमरावती महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळ यांच्यासह विविध घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रहार संघटना सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. या आंदोलनाला विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला होता. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प पडली होती. आता आंदोलनाची पुढील दिशा येत्या २९ जुलैला ठरवली जाणार आहे.

सरकारला राज्यात अशांतता हवी आहे. म्हणूनच कर्जमाफीचा निर्णय घेतला जात नाही. कर्जमाफीसाठी समिती नेमली पण अध्यक्षाला माहिती नाही. आता गांधीगिरी संपली, भगतसिंगगिरी सुरू झाली आहे. आत्महत्या करण्याऐवजी लढा दिला पाहिजे. कृषिमंत्री विधानभवनात रमी खेळतायत आणि युवक रमी खेळून मरत आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.