पुण्यात आणखी एका राजकीय पक्षाची होणार महाविकास आघाडीशी युती
-आघाडीत नेमके चाललंय काय?
प्रतिनिधी
पुणे : एकीकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिपूर्ण लढती होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली असताना, महाविकास आघाडीत सहभागी असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मनसेबरोबर निवडणूक लढायला ‘मन’से तयार होणार का, याबाबतच प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. मनसेने पुण्यात ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली असल्याने महाविकास आघाडीत बेरीज घडणार, की आघाडीचे समीकरण बिघडणार, याची उत्सुकता आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सलग विजयांचा ‘वारु’ पुणे महापालिकेच्या निवडणुकीत रोखायचा असेल, तर महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाला एकत्र येऊन निवडणूक लढवावी लागेल. याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चाही झाली. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील (मनसे) शिवसेना (ठाकरे) पक्षाला महापालिका निवडणुकीत साथ देऊन निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा विचार सुरू केला आहे. याबाबत मनसे आणि शिवसेना (ठाकरे) पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वी बैठकही झाली. यामध्ये दोन्ही पक्षांची युती जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाते.
या बैठकीत महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचे सूत्र आणि निवडणुकीला सामोरे जाण्याच्या रणनीतिवर प्राथमिक चर्चा करण्यात आली. या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित निवडणूक लढविण्यासाठी अनुकूलता दाखविली असली, तरी महाविकास आघाडीत मनसेला स्थान मिळणार का, यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेची ताकद महाविकास आघाडीसाठी फायद्याची ठरणार असली, तरी अनेक भागांत मनसेच्या सहभागामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारांना फटका बसण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.


