नितीन गडकरी का म्हणाले, गरिबीमध्ये आनंद असतो…!

नितीन गडकरी का म्हणाले, गरिबीमध्ये आनंद असतो…!

-अमरावती जिल्ह्यातील माधान येथील कार्यक्रमाला उपस्थिती

प्रतिनिधी
अमरावती : केवळ भौतिक विकासातून सर्व अपेक्षा पूर्ण होत नाहीत. गाडी, बंगला यातून काही सर्व सूख मिळत नाही. उलट ज्या ठिकाणी भौतिक प्रगती होते, त्या ठिकाणी दु:खाची सुरुवात होते. गरिबीमध्ये जो आनंद असतो, समृद्ध जीवनामधील समस्या तो आंनद हिरावून घेत असतो. पण, या अडचणीत सापडायचे नसेल, तर उत्तम संस्कार पाहिजेत. उत्तम संस्कार बाजारात किलोने मिळत नाहीत. शिक्षणामधून, ज्ञानाचे अध्ययन, चिंतन करून, व्यक्तिमत्वावर होणाऱ्या संस्कारातून माणसाचे जीवन घडत असते. तत्वज्ञान हे आपल्या जीवनाला बदलवू शकते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील माधान येथे समदृष्टी, क्षमताविकास आणि संशोधन मंडळ आणि श्री संत गुलाबराव महाराज संस्थान तर्फे दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, बालपणापासून अंध असलेल्या संत गुलाबराव महाराजांनी जगाला आश्चर्यचकित करेल, अशी साहित्य निर्मिती केली आहे. जन्माने अंध असले तरी त्यांनी सर्व अडचणींवर मात करीत आत्मविश्वासाने उच्च दर्जाची साहित्य निर्मिती केली. त्यांच्या साहित्य निर्मितीमुळे माधान ही संदेश देणारी भूमी झाली आहे. गुलाबराव महाराजांनी निर्माण केलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. आज ज्ञानेश्वरीने ज्ञानाचे भांडार आणि अभ्यासक निर्माण केले आहे. त्याच प्रकारचे अभ्यासक निर्माण करण्याची क्षमता प्रज्ञाचक्षूंच्या ग्रंथसंपदेत आहे.

नितीन गडकरी म्हणाले, समाजाची भौतिक प्रगती होणे आवश्यक आहे. पण समाज स्वस्थपणे जगण्यासाठी दिशा देण्याचे कार्य ज्ञानामध्ये आहे. यासाठी संतांनी दिलेले ज्ञान जतन करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे ज्ञान जपले पाहिजे. ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञानाचे परिवर्तन झाल्यास यातून समृद्धी निर्माण होते. चांदूरबाजार आणि परिसरामध्ये संत्र्याच्या उत्पन्नातही स्पेन आणि इजराइलच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे. ज्ञानाचा उपयोग परिवर्तनामुळे कशा पद्धतीने शक्य झाले आहे, याचे उदाहरण यातून दिसून आलेले आहे. त्यामुळे गुलाबराव महाराजांच्या १३० पुस्तकांचे जतन संस्थांनकडून व्हावे.