नागपुरात या पक्षात उफाळून आला निष्ठावंतांचा असंतोष
-नेमके काय झाले ते वाचा?
प्रतिनिधी
नागपूर : एखाद्या गोष्टींचा अतिरेक झाला तर त्याचे काय परिणाम होतात. याचे उत्तम उदाहरण सध्या नागपूर जिल्ह्या भारतीय जनता पक्षात पाहायला मिळते. विरोधी पक्ष कमकुवत व्हावा म्हणून त्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देताना पक्षातील जुन्या नेत्यांना काय वाटेल याची तमाच न बाळगल्याने पक्षातील निष्ठावंताचा असंतोष आता उफाळून बाहेर येऊ लागला आहे. याची सुरुवात माजी आमदार सुधीर पारवे यांनी केली. आता सावनेर तालुक्यातूनही तेच सूर ऐकायला मिळू लागले आहेत.
पार्टी विथ डिफरंनस, निष्ठा, संस्कृती या शब्दांना गुंडाळून ठेवत आता नवा भारतीय जनता पक्ष उदयास आला असून या पक्षात सध्या स्वपक्षातील कतृत्ववान नेत्यांपेक्षा इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांवर अधिक विश्वास दाखवला जात आहे. यामुळे स्वाभाविकपणे पक्षासोबत अनेक वर्षे घालणारे व म्हणून स्वत:ला निष्ठावंत म्हणून घेणारे नेते सध्या पक्षावर, तो चालवणा-या नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या तीन प्रमुख नेत्यांच्या नागपूर जिल्ह्यात सध्या निष्ठावंत -विरूध्द आयात नेते असा वाद पेटला आहे.
वादाची सुरूवात झाली ती जिल्हा भाजपच्या कार्यकारिणीवरून. यात बाहेरून आलेल्यांच्या समर्थकांना अधिक प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे जुने नेते संतापले. त्याची पहिली ठिणगी उमरेड विधानसभा मतदारसंघात तेथील माजी आमदार सुधीर पारवे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या नाराजीच्या पत्राच्या रुपात पडली.