दादांच्या नावावर आहे या उपलब्धी : विक्रम म्हणून झाली नोंद

दादांच्या नावावर आहे या उपलब्धी : विक्रम म्हणून झाली नोंद

-महिनाभरात सादर करणार होते १२ वा अर्थसंकल्प

प्रतिनिधी
मुंबई : राज्याचा सर्वाधिक १३ वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम विदर्भातील बॅ. शेषराव वानखेडे यांचा आहे. अजित पवार यांनी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमात अजित पवार दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना विद्यमान वित्तमंत्रीपदाचा कार्यकाल पुर्ण करता आला असती तर सर्वाधिक १५ वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री म्हणून त्यांच्या नावावर विक्रम झाला असता.

अजित पवार यांनी वर्ष २०२५-२६ सालचा अर्थसंकल्प सादर करून माजी अर्थमंत्री बॅ. शेषराव वानखेडेंच्या अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले होते. पवारांचा मागच्या वर्षी हा ११ वा अर्थसंकल्प सादर केला होता. यापूर्वी काँग्रेसचे जुने जाणते नेते बॅ. शेषराव वानखेडे यांनी १३ वेळा, राष्ट्रवादीचे सांगलीचे जयंत पाटील यांनी १० वेळा आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी ९ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. अजित पवार यांनी सादर केलेला २०२५-२६ चा अर्थसंकल्प ७ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा होता.

वर्ष २०११-१२, वर्ष २०१२-१३, वर्ष २०१४-१५ मध्ये दोन अर्थसंकल्प, वर्ष २०२०-२१, वर्ष २०२१-२२, वर्ष २०२२-२३, वर्ष २०२४-२५ मध्ये दोन अर्थसंकल्प आणि वर्ष २०२५-२६ अशा तब्बल ११ वेळा अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. २३ फेब्रुवारी पासून मुंबईत प्रारंभ होणऱ्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करण्याची अजित पवार यांच्या विभागाची तयारी चालू होती. त्यासंदर्भात अजित पवार यांच्या बैठका चालू होत्या. राज्याने आर्थिक शिस्त पाळली पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता.

अजित पवार यांचे अर्थसंकल्प सादरीकरणाचे भाषण तडाखेबंद असे. अर्थसंकल्पामध्ये कुठल्या वर्गावर अन्याय होणार नाही, याकडे त्यांचा कटाक्ष असे. वर्ष २०२४-२५ सालच्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने जाहीर केली. या योजनेने महायुती सरकारच्या हाती पुन्हा सत्ता आली. तेव्हापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचाही रंग गुलाबी झाला.

१५ व्या महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल २०२९ पर्यंत आहे.अजित पवार यांच्याकडे वित्तमंत्री पद होते. हे सरकार स्थिर आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या उर्वरीत कार्यकाळात आणखी ४ अर्थसंकल्प सादर करण्याची अजित पवार यांना संधी होती. काळाने त्यांच्यावर घाला घातला नसता तर २०२९ मध्ये १५ वेळा अर्थसंकल्प सादर करुन बॅ. शेषराव वानखेडे यांचा विक्रम मोडला असता.

बॅ. शेषराव वानखेडे-काँग्रेस १३, अजित पवार -राष्ट्रवादी ११, जयंत पाटील-राष्ट्रवादी १०, सुशिलकुमार शिंदे -काँग्रेस ९, बॅ. रामराव आदीक -काँग्रेस ७, सुधीर मुनगंटीवार-भाजप ६, मधुकरराव चौधरी -काँग्रेस ५, यशवंत मोहिते -काँग्रेस ४, एकनाथ खडसे-भाजप ३, स. गो. बर्वे -काँग्रेस २, महादेव शिवणकर-भाजप २, दिलीप वळसे पाटील -राष्ट्रवादी २, देवेंद्र फडणवीस -भाजप १, व्ही. सुब्रमण्यम -काँग्रेस १ या नेत्यांनी आजपर्यंत राज्याचे अर्थसंकल्प सादर केले आहेत.