काय बोलता ? थेट समोस्यावर झाली संसदेत चर्चा
-असमान किमतींबद्दल बोलताना केले भाष्य
प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात गोरखपूरचे भाजपा खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी लोकसभेत सामोश्याचा मुद्दा उपस्थित केला. हा मुद्दा संसदेत चांगलाच गाजला. त्यांनी विविध ठिकाणी खाद्यपदार्थांच्या असमान किमतींबद्दल बोलताना समोशाचे उदाहरण दिले. रवी किशन यांनी ढाब्यांपासून ते पंचतारांकित हॉटेल्सपर्यंतच्या खाद्यपदार्थांच्या किमती आणि प्रमाण याचे नियमन करण्याची विनंतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या विषयाच्या विविध पैलूंबद्दल सांगितले.
तुम्ही खाद्यपदार्थ आणि त्यांच्या किमतींचा मुद्दा उपस्थित करण्यामागील कारण काय होते?
रवी किशन म्हणाले, मी गोरखपूरचा आहे आणि त्या भागात ९८ टक्के मतदार गरीब आहेत. बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीमुळे (एसआयआर) संसदेचे कामकाज योग्यरित्या चालत नव्हते. मी एक कलाकार असल्यामुळे लोकांच्या प्रश्नांविषयी संवेदनशील आहे. मी गरिबी पाहिली आहे, बाहेर जेवताना खाद्यपदार्थातील खराब तेलामुळे माझा घसा खराब झाला आहे. युरोप आणि अमेरिकेत, खाद्यपदार्थात कोणत्या प्रकारचे तेल वापरले आहे, यासारखी माहिती (पॅकेजिंगवर) लिहिलेली असते.