एकनाथ शिंदे म्हणाले, उद्धव ठाकरेंना, साहेब ! तुमच्या भेटीची आस…?
-पुढील राजकीय वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
प्रतिनिधी
मुंबई : विधानपरिषदेतल्या ९ सदस्यांचा निरोप समारंभ मंगळवारी विधानपरिषदेत पार पडला. या नऊ सदस्यांमध्ये उद्धव ठाकरेंचाही समावेश होता. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना निरोप देताना त्यांचा उल्लेख साहेब असा केला. उद्धव ठाकरेंनीही विविध मुद्द्यांना स्पर्श करत टोलेबाजी केली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी त्यांना उत्तर दिले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले,...
आपले सदस्य निवृत्त होत आहेत. कधी कधी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होतात. पण आपण आज हळव्या वळणावर आलो आहोत. नऊ सदस्य आहेत, ज्यात उद्धव ठाकरे साहेब आहेत. उद्धव ठाकरे साहेब आज निवृत्त होत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, राजेश राठोड देखील आज निवृत्त होत आहेत. राजेशजी शांत व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ग्रामीण भागातील विकास याकडे आपला कायम भर असतो. सभागृहात विरोधकांची गरज असते तेव्हा राजेश राठोड यांच योगदान देखील असतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नातं तुटत नाही. निरोपाचा सण नाही, तुमच्या भेटीसाठी आतुर हे मन आहे, तुमच्या भेटीची आस पु्न्हा आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा नामोल्लेख टाळत उत्तर दिलं.


