उमेद मॉल वाढवणार महिलांनाच्या उत्पादन विक्रीची संधी
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुसज्ज उमेद मॉलची निर्मिती
प्रतिनिधी
नागपूर : जिल्हास्तरावर बळकस चौक, महाल नागपूर या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांना उत्पादन विक्रीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हास्तरीय उमेद मॉल निर्मित करण्यात येणार आहे. ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महिलांना कायमस्वरूपी शाश्वत उपजीविका निर्माण करून देण्यासाठी सक्रियतेने काम करीत आहे. उद्योग करणाऱ्या हजारो महिलांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी यासाठी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हास्तरावर उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याची घोषणा करून त्यासाठी वित्तीय तरतूद देखील केली आहे. यामुळे महिलांना उत्पादन विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळणार असल्याची भावना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, विनायक महामुनी यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील महिलांना बचत समूहांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे रोजगार भिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचे सूक्ष्म व लघुउद्योग स्थापन केले जातात. उद्योगांना अधिक चालना मिळावी यासाठी अनेक बँकांच्या माध्यमातून वित्तीय कर्ज महिलांना उपलब्ध करून देण्यात येते. आजमितीस नागपूर जिल्ह्यात तब्बल 19 हजार स्वयं सहायता समूहांची स्थापना झालेली असून या माध्यमातून 2 लाख महिलांना प्रत्यक्ष अभियानाचा लाभ दिला जात आहे. 13 तालुक्यांमध्ये जवळजवळ उत्पादन निर्मिती करणारे 3 हजार समूहांची संख्या आहे. शेती आधारित, बिगर शेती आधारित आणि अ कृषी घटकात महिला व्यक्तिगत व सामूहिक पद्धतीने यशस्वीरित्या आपले उद्योग करीत आहेत. महिलांच्या माध्यमातून लाकडी खेळणी, लाकडापासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू, म्युरल पेंटिंग, चप्पल, शर्ट्स, लेडीज कुर्ती, मुलींचे ड्रेस, विविध प्रकारची ज्वेलरी, लाखेच्या बांगड्या, हातमागच्या बेडशीट, पिलो कव्हर, गृह सजावटीच्या वस्तू, अगरबत्ती, हळद, मिरची, मसाले, लोणची, विविध प्रकारची पापड, टोमॅटो सॉस, नूडल्स, सरगुंडे, तूर डाळ, हरभरा डाळ, तांदूळ, खमंग ढोकळा प्रिमिक्स, केक प्रिमिक्स, बिस्किट असे अनेक उत्पादनांची निर्मिती महिला करीत आहेत.
ग्रामीण भागातील महिलांसाठी व्यावसायिक पद्धतीने उभारला जाणारा उमेद मॉल खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी एक पर्वणीची संधी आहे. यामुळे महिलांना बाजारपेठ संशोधनासह ग्राहकांच्या अपेक्षा जाणून घेता येतील. महिलांना आवश्यक ते बदल करता येतील आणि नक्कीच या मॉलचा मोठ्या प्रमाणात फायदा ग्रामीण उद्योगिनींना मिळणार आणि त्यांचा उद्योग वाढीस लागणारा असा आशावाद प्रकल्प संचालिका वर्षा गौरकर यांनी व्यक्त केला. तसेच शासन स्तरावरून निधी उपलब्ध झाल्यास लवकरात लवकर आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून मॉलचे बांधकाम गतिशील पणे केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.